गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्रिपुराच्या स्नेहा देबनाथ हिचा मृतदेह गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ सापडला आहे. स्नेहा दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी होती. तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने तिच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा ७ जुलै रोजी पर्यावरण कॉम्प्लेक्समधून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती.
कुटुंबाने दिलेल्या चिठ्ठीत सिग्नेचर ब्रिजवरून उडी मारण्याचा तिचा हेतू असल्याचं दिसून आलं होतं. प्राथमिक माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी स्नेहाचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान एका कॅब ड्रायव्हरने स्नेहाला सिग्नेचर ब्रिजवर सोडल्याचं सांगितलं. त्यानंतर स्नेहाचं शेवटचं लोकेशन सिग्नेचर ब्रिज असल्याचं समजलं.
काही प्रत्यक्षदर्शींनी तपास पथकाला सांगितलं की, त्यांनी ब्रिजवर एक मुलगी उभी असल्याचं पाहिलं आहे. त्यानंतर एनडीआरएफची मदत घेण्यात आली. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने निगम बोध घाट ते नोएडापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर गीता कॉलनी फ्लायओव्हरजवळ तिचा मृतदेह सापडला.
काही महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ
दिल्ली पोलिसांनी असंही म्हटलं आहे की, स्नेहाच्या जवळच्या मैत्रिणींनी सांगितलं की, ती गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ होती. इतकेच नाही तर स्नेहाने त्या दिवशी सकाळी ईमेल आणि व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला होता. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मैत्रिणींनी सांगितलं की स्नेहा गेल्या काही महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि त्रासलेली होती.
मैत्रिणीचा मोठा दावा
पीटीआयच्या वृत्तानुसार, स्नेहाने एक चिठ्ठी लिहिली होती ज्यामध्ये तिने यमुना नदीवर बांधलेल्या पुलावरून उडी मारण्याबाबत म्हटलं होतं. स्नेहाच्या एका जवळच्या मैत्रिणीने पत्रकारांना मेल पाठवून दावा केला की, जेव्हा स्नेहा सिग्नेचर ब्रिजवर दिसली तेव्हा पुलावर किंवा जवळपास कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत स्थितीत नव्हता. हा पूल ४-५ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत येतो आणि या ठाण्यांमध्ये वेगवेगळे कॅमेरेही बसवले आहेत, परंतु त्यापैकी एकही कॅमेरे कार्यरत स्थितीत नाही.
कुटुंबीयांना मोठा धक्का
स्नेहाचा कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. आई-वडिलांनी लेकीच्या मृत्यूची बातमी समजताच टाहो फोडला. पोलिसांनी सांगितलं की, १९ वर्षीय स्नेहाच्या कुटुंबाने मेहरौली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबाने त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं की, स्नेहा दिल्ली विद्यापीठाच्या आत्मा राम सनातन धर्म महाविद्यालयात शिकत होती. तिने शेवटचा ७ जुलै रोजी कुटुंबाशी संपर्क साधला होता.