Deepali Chavan Suicide: श्रीनिवास रेड्डींसंदर्भात चांगले लिहून देण्यासाठी दबावतंत्राचा वापर; धक्कादायक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:08 IST2021-03-28T02:09:47+5:302021-03-28T06:08:09+5:30
दीपाली आत्महत्या प्रकरण : दबावाला बळी न पडण्याचे वन संघटनांचे आवाहन

Deepali Chavan Suicide: श्रीनिवास रेड्डींसंदर्भात चांगले लिहून देण्यासाठी दबावतंत्राचा वापर; धक्कादायक प्रकार उघड
परतवाडा (जि. अमरावती) : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आलेले अमरावतीचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी हे चांगले अधिकारी आहेत. त्यांनी चांगल्याप्रकारे मेळघाटचा विकास केला. त्यांचे मोलाचे योगदान आहे. अशा प्रकारचे पत्र वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांच्याकडून लिहून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासंदर्भात कुणीही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
दीपाली आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रेड्डी यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांच्या परिवारासह समाजबांधव व वन विभागातील अधिकारी-कर्मचारी व विविध संघटनांनी केली होती. परिणामी, प्रशासनाच्या वतीने त्यांना तडकाफडकी नागपूर येथे पाठविण्यात आले. शिवकुमार याला पाठीशी घातल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे.
उपवनसंरक्षकाकडून दबाव?
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे कुठल्याच दबावाला बळी पडू नका तथा आपल्या एका बहिणीच्या मारेकऱ्यासाठी गद्दारी करू नका, असा मेसेज सोशल मीडियावर वनकर्मचाऱ्यांना पाठवून जनजागृती केली जात आहे.
रेड्डी यांनी मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली, अशा आशयाचे पत्र वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून लिहून घेतले जात असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात काही उपवनसंरक्षकांशी आम्ही चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी निडर राहावे. दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून द्यायचा आहे.- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना, अमरावती.
रवि, नवनीत राणांनी घेतली आयजींची भेट
दीपाली यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला उपवनसंरक्षक शिवकुमार याला पाठीशी घालणारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने अटक करावी व दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांची शनिवारी दुपारी भेट घेतली. त्यांच्याशी या प्रकरणावर अर्धा तास चर्चा केली.