रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा सण, पण याच दिवशी एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भावाकडून स्वतःच्या संरक्षणाचे वचन घेणाऱ्या एका बहिणीने त्याच भावाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात मध्यस्थी करत असताना बहिणीला धक्का लागला आणि ती डोक्यावर पडली. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
काय घडलं?
ही घटना इमिलिया थोक गावात घडली. महेश कुटार या व्यक्तीचे रविवारी दारूच्या नशेत त्याचे शेजाऱ्यासोबत भांडण झाले. तो घरी परतला, पण काही वेळाने शेजारी त्यांच्या घरातील महिलांना घेऊन त्याच्या घरी आला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
भांडणात मध्यस्थी करताना घडली दुर्घटना
गोंधळ ऐकून महेशची ५५ वर्षीय बहीण उर्मिला देवी भांडण सोडवण्यासाठी धावून आली. त्याचवेळी शेजाऱ्यांच्या घरातील महिलांनी तिला जोराचा धक्का दिला, ज्यामुळे ती सिमेंटच्या कट्ट्यावर आदळली आणि तीच्या डोक्याला दुखापत होऊन, गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
कुटुंबातील सदस्यांनी उर्मिलाला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी रक्षाबंधनानिमित्त उर्मिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आली होती. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात आक्रोश सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फॅक्टरी एरिया पोलीस चौकीचे प्रभारी राजवीर सिंह यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.