घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 22:11 IST2022-01-17T22:10:58+5:302022-01-17T22:11:38+5:30
घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने मुंबईत खळबळ उडाली होती.

घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने मुंबईत खळबळ उडाली होती. मात्र त्या मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय उपसमितीने सोमवारी दिला.
मुंबईतील १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण ३ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे. यात, पालिका, शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत एक लाख ४७ हजार ९४४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या वयोगटासाठी फक्त कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे. मात्र १४ जानेवारी २०२२ रोजी एका व्यक्तीने ट्वीटरवर, १५ वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला, अशी बातमी पसरवली.
या बातमीची सखोल तपासणी करून अहवाल बनवण्यात आला आहे. लसीकरणानंतर घडणार्या प्रतिकूल घटनांची चिकित्सा करण्यासाठी वैद्यकीय तज्ञांची राज्य स्तरीय उपसमिती बनविण्यात आली आहे. या समितीने सोमवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सदर घटनेचा अहवाल समितीसमोर सादर करण्यात आला. त्याची शहनिशा केल्यानंतर त्या मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नाही, असे स्पष्ट मत समितीने नोंदविले आहे.