हरियाणातील हिसार येथील आझाद नगर साकेत कॉलनीमध्ये एका मुलीने तिच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या आईला मारहाण करताना दिसत आहे. सध्या पोलिसांनी महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आझाद नगर पोलीस स्टेशनचे प्रमुख साधू राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या महिलेवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत्तीच्या कारणावरून मुलगी तिच्या आईला मारहाण करायची. अमरदीपने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्याची बहीण रीता हिचं संजय पूनियाशी लग्न झालं होतं. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनी ती तिच्या आईसोबत आझाद नगरमध्ये राहू लागली.
काही दिवस ती आईशी चांगली वागली. पण नंतर ती आईचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागली. आईवर घर तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. बहिणीचा नवरा बेरोजगार आहे, म्हणून तो आईच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी दबाव आणतो. जमीन त्यांच्या नावावर न केल्यामुळे त्यांनी आईला घरात कोंडून ठेवलं आहे.
मुलाने सांगितलं की जेव्हा तो त्याच्या आईकडे येतो तेव्हा त्याच्यावरही खोटे आरोप केले जातात. आझाद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी साधु राम यांना या प्रकरणात कारवाई करण्याची विनंती आहे. तसेच बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला आईच्या घरातून हाकलून लावा असंही म्हटलं आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.