डेटिंग अॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 14:59 IST2024-09-23T14:58:22+5:302024-09-23T14:59:42+5:30
Dating App Cyber Fraud in Mumbai: मुलाने आपण परदेशात असल्याचे सांगत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं

डेटिंग अॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
Dating App Cyber Fraud in Mumbai: मुंबईतील एका ४३ वर्षीय महिलेची डेटिंग ॲपद्वारे लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची माहिती नुकतीच उघड झाली. डेटिंग अँपच्या माध्यमातून एका पुरुषाने तिच्याकडून काही पैसे मागितले आणि त्या महिलेने पैसे दिल्यामुळे तिची फसवणूक झाली. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या तक्रारदाराची गेल्या महिन्यात टिंडरवर 'अद्वैत' नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. दोघांनी मेसेजद्वारे एकमेकांशी संवाद साधला. त्या व्यक्तीने आपण परदेशात असून १६ सप्टेंबर रोजी मुंबईत भेटण्याचे सांगितले. तेथूनच फसवणुकीला सुरूवात झाली.
कशी झाली फसवणूक?
अव्दैत आणि त्या महिलेची ओळख झाल्यानंतर काही दिवसाने एका पुरुषाचा फोन आला. त्याने आपण दिल्ली कस्टम अधिकारी असल्याचा दावा केला आणि तिला सांगितले की तिचा मित्र अद्वैत हजारो युरोंसह विमानतळावर पकडला गेला आहे. त्या अधिकाऱ्याने मित्राच्या सुटकेसाठी महिलेकडून UPI द्वारे एकूण ₹३.३७ लाख देण्याची विनंती केली. त्या महिलेनेही ती रक्कम भरून टाकली.
नंतर कॉलरने तिला आणखी ४ लाख ९९ रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. जेव्हा ती तिच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गेली तेव्हा तिथल्या एका अधिकाऱ्याने तिला कारण विचारले. त्या संवादातून ती सायबर फसवणुकीची शिकार झाल्याचे लक्षात आले. गोंधळ उघडकीस आल्यावर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वर्सोवा पोलीस ठाण्यात अज्ञात फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास प्रक्रिया सुरू आहे.