नाशिक, कर्नाटकचे ‘ते’ दोघे अमरावतीत जेरबंद
By प्रदीप भाकरे | Updated: January 19, 2024 17:01 IST2024-01-19T17:00:39+5:302024-01-19T17:01:11+5:30
चायना चाकू, खंजीरसह कार जप्त, गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई

नाशिक, कर्नाटकचे ‘ते’ दोघे अमरावतीत जेरबंद
अमरावती : घातक शस्त्रे बाळगून कारने फिरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने १८ जानेवारी रोजी रात्री वडाळी नाका परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून चायना चाकू, खंजीरसह कार असा एकूण २ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जावेद शेख वल्द अनीस शेख (३८, रा. नाशिक), मोहम्मद अरफाद वल्द शेख हुसेन (३०, रा. बंगलोर, कर्नाटक) व अब्दुल अहफाज वल्द अब्दुल अजीज (२४, रा. लालखडी, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी वडाळी नाका येथे संशयास्पदरित्या आढळून आलेल्या एका कारला अडवून झडती घेण्यात आली. झडतीत कारमध्ये ७ चायना चाकू, खंजीर अशी घातक शस्त्रे आढळून आली. त्यानुसार पथकाने कारमधील जावेद शेख, मोहम्मद अरफाद व अब्दुल एैफाज यांना अटक केली.
त्यांच्याकडून घातक शस्त्र व कार असा २ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, संजय वानखडे, राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, नीलेश वंजारी, संदीप खंडारे यांनी केली.