Criminal murder committed in Nagpur: Love marriage took place 25 days ago |  नागपुरात  भरदिवसा गुन्हेगाराची हत्या  : २५ दिवसांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

 नागपुरात  भरदिवसा गुन्हेगाराची हत्या  : २५ दिवसांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

ठळक मुद्देसाळ्यासह चार आरोपी अटकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : यशोधरानगर येथील वीट भट्टी परिसरात साळ्याने मामाच्या मदतीने जावायाची हत्या केली. पोलीसांनी आरोपी साळ्यासोबतच चार नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती. मृतकाचे नाव नितीन उर्फ छोटू काल्या कसोदिया (२२) आहे. तो धम्मदीपनगर येथील रहिवासी आहे.
काल्या हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध खुणाचे १७ गुन्हे दाखल आहे. मृतकाची पत्नी धम्मदीपनगर परिसरातील रहिवासी आहे. दोघांचे घर जवळ जवळ होते. सुत्रांच्या मते काल्याने १ मार्चला पळुन जावून लग्न केले. त्यामुळे त्याच्या पत्नीचे नातेवाईक चिंतेत होते. काल्या ५ मार्च रोजी लग्न करून परतला. त्याने यशोधरानगर पोलीसांना सूचनाही दिली. काही दिवसापूर्वी काल्याच्या पत्नीला कुटुंबियांनी मामाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगून घरी बोलाविले होते. त्यानंतर ती आपल्या कुटुंबासोबतच राहत होती.
सुत्रांकडून सांगण्यात आले की, आज दुपारी ४ वाजता काल्याला त्याच्या साळ्याने बोलाविले. काल्या पत्नीच्या घरापासून काही अंतरावरच बसला होता. त्याचवेळी त्याचा साळा मामाला घेऊन चार ते पाच नातेवाईकासोबत पोहचला. तिथे काल्यासोबत वाद घातला. त्यांनी काल्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जखमी केले. घटनेची माहिती मिळाल्यावर यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहचली. त्यांनी काल्याला रुग्णालयात पोहचविले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे.

Web Title: Criminal murder committed in Nagpur: Love marriage took place 25 days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.