Crime News in Marathi: जमीन,पैसा, संपत्तीमुळे जवळच्याच माणसांना संपवल्याच्या अनेक घटना घडत आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने जमिनीच्या वादातून आईवडिलांसह बहिणीचे कुऱ्हाडाने वार करत हत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी सांगितले की, तरुणाचा गेल्या काही महिन्यांपासून आईवडिलांसोबत वाद सुरू होता. जमिनीवरून हा वाद होता. त्यातूनच त्याने बहिणीसह आईवडिलाची हत्या केली.
आई-वडील, बहिणीची कुऱ्हाडीने हत्या
कुटुंबात जमिनी वाटणीवरून वाद सुरू होता. आईवडिलांनी काही जमीन मुलीच्या नावावर केली. त्यामुळे मुलगा चिडला आणि त्याने कुऱ्हाडीने तिघांची हत्या केली. रविवारी (२७ जुलै) ही घटना घडली. तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथक स्थापन करण्यात आली असून, ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.
गाजीपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. इरज राजा यांनी सांगितले की, या कुटुंबात जमिनीचा वाद सुरू होता. वाद सुरू असतानाच आईवडिलांनी काही जमीन मुलीच्या नावावर केली. त्यामुळे मुलगा अभय यादव हा नाराज होता. त्यातून त्याने तिघांची हत्या केली.
मृतांची नावे काय?
शिवराम यादव (वय ६५), जमुनी देवी शिवराम यादव (वय ६०) आणि कुसुम देवी (वय ३६) असे हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. आरोपी अभय यादव गाजीपूरमधील एका खासगी कारखान्यात कामाला होता. त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. शिवराम यादव यांच्याकडे अडीच हेक्टर जमीन होती. त्यापैकी एकतृयीयांश जमीन शिवराम यादव यांनी कुसुम देवीच्या नावावर केली होती.