संतापजनक! 3 जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:57 AM2022-01-28T11:57:19+5:302022-01-28T12:02:27+5:30
Crime News : 3 जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. नौदल आणि लष्कराच्या 3 जवानांनी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने दिल्लीपोलिसांकडे (Delhi Police) तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 जणांनी महिलेवर दोन वेळा सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा अश्लील व्हिडिओही बनवला. त्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भयंकर घटनेनंतर पीडित महिला दिल्ली सोडून तिच्या गावी गेली. पतीने समजावल्यानंतर महिलेनं पुन्हा दिल्लीला येऊन आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या घराजवळील एका पार्कमध्ये फिरत होती, त्याच दरम्यान तिच्या शेजारी राहणारा एक आरोपी तेथे पोहोचला आणि कुटुंबाला भेटण्याच्या बहाण्याने घरी येण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतरही आरोपीनं तिला जबरदस्ती केली आणि घरी घेऊन गेला. आरोपीचा एक मित्र तिथे आधीच हजर होता. दोघांनी महिलेवर बलात्कार केला आणि यादरम्यान व्हिडिओही बनवला.
महिलेला दोघांनीही धमकी दिली की, याबाबत कोणाला सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल. यानंतर महिला तिच्या घरी गेली आणि बाहेर जाणे बंद केले. दोन महिन्यांनंतर पीडिता काही कामानिमित्त घराबाहेर पडली असता, आरोपीने तिला पुन्हा एकदा पकडून मुनिरका येथे नेले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. येथे त्याने आधी एका घरात नेऊन स्वत: बलात्कार केला आणि त्यानंतर मित्रालाही बोलावलं मित्रानं सुद्धा पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला पतीसह गावी परतली आणि दिल्लीला येण्यास नकार दिला.
महिलेने कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत न येण्याचे म्हटलं. त्यावर पतीनं तिला कारण विचारले असता तिने संपूर्ण प्रकरण पतीला सांगितले. त्यानंतर पतीने तिला दिल्लीला जाऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक नौदलात तर दोन लष्करात आहेत. पीडितेच्या वकिलाने सांगितले की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिघांचाही शोध घेत आहेत. आता आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.