Crime News: दररोजच्या भांडणाला कंटाळून नालासोपाऱ्यात पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 17:36 IST2022-10-16T17:35:18+5:302022-10-16T17:36:28+5:30
Crime News: दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे.

Crime News: दररोजच्या भांडणाला कंटाळून नालासोपाऱ्यात पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या
- मंगेश कराळे
नालासोपारा - दररोज होणाऱ्या भांडणाला कंटाळून रागाच्या भरात ४९ वर्षीय पतीने ४५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना लक्ष्मी नगर परिसरात रविवारी पहाटे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.
नालासोपाऱ्याच्या लक्ष्मी नगरमधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आरोपी पती बंडू कवटे (४९) याने रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. मयत जयश्री कवटे (४५) आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. जयश्री या दहिसर येथे कामाला जायच्या. बंडू मागील तीन वर्षांपासून बेरोजगार असल्याने तो दारूच्या नशेत त्यांच्यासोबत सतत भांडण करायचा. या दोघांना २४ वर्षाचा मुलगा असून तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता.
शनिवारी रात्री असाच प्रकारचे भांडण झाले असता या भांडणाचा राग मनात ठेऊन त्याची पत्नी साखर झोपेत असताना त्याने तीची गळा आवळून हत्या केली. सकाळी शेजाऱ्याच्याने तुळींज पोलिसांना माहिती दिली. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली आहे.