Crime News: धक्कादायक! दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाची हत्या, कोपर खैरणेतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 19, 2022 18:20 IST2022-10-19T18:19:20+5:302022-10-19T18:20:01+5:30
Crime News: अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून मारेकरुंचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime News: धक्कादायक! दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाची हत्या, कोपर खैरणेतली घटना
नवी मुंबई - अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचुन हत्या केल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून मारेकरुंचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
साहिल शांताराम गोळे (१७) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सकाळी कोपर खैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदान लगत त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या वेळी त्याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास त्याचा मृतदेह आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता साहिल याचे डोके दगडाने ठेचुन त्याची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानुसार मृतदेह ताब्यात घेऊन मारेकरुंचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरोधात कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वाशीतील महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेणारा साहिल रात्रीच्या वेळी एका ठिकाणी पार्ट टाईम काम करत होता असेही समजते. मंगळवारी रात्री तो काही कामानिमित्ताने कामाच्या ठिकाणी हजेरी लावून पुन्हा कोपर खैरणेत आला होता असेही समोर आले आहे. यादरम्यान तो कोणाला भेटला ? हे स्पष्ट होताच मारेकरुंचा शोध लागू शकतो. त्यानंतर हत्येमागचा उद्देश स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गतमहिन्यात सेक्टर ३ येथे उद्यानात अशाच प्रकारे एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरच पुन्हा अशी घटना घडल्याने कोपर खैरणे परिसरातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या दहशत पसरवत असल्याचे दिसून येत आहे.
दोन संशयित ताब्यात
साहिलच्या हत्येनंतर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. त्याद्वारे बुधवारी दुपारी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.