नोकरीचे आमिष देणाऱ्या Keepshare App ला ईडीचा दणका
By मनोज गडनीस | Updated: October 3, 2022 20:16 IST2022-10-03T20:13:38+5:302022-10-03T20:16:24+5:30
५ कोटी रुपये जप्त, चीनी कंपनीचा सहभाग

नोकरीचे आमिष देणाऱ्या Keepshare App ला ईडीचा दणका
मनोज गडनीस, मुंबई - मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांना पार्ट टाईम नोकरी देण्याचे तसेच गुंतवणुकीच्या योजना सादर करणाऱ्या 'किपशेअर' या ॲप कंपनीला ईडीने सोमवारी दणका देत कंपनीच्या बँक खात्यातील ५ कोटी ८५ लाख रुपये जप्त केले आहेत. बंगळुरूस्थित या कंपनीच्या ॲपचे देशभरात ग्राहक होते. तूर्तास जरी ५ कोटी ८५ लाख रुपयांची जप्ती झाली असली तरी याद्वारे आणखी व्यवहार उघडकीस येण्याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एका चीनी कंपनीने भारतातील काही लोकांना हाताशी धरून येथे त्यांच्या ओळखपत्रांचा वापर करत कंपनी सुरू केली. तसेच, या कंपनीने एक ॲप तयार केले. ज्यांना पार्ट टाईम काम करत अधिक पैसे कमवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही योग्य संधी असल्याचे सांगत या ॲपचा प्रचार देशभरात केला. या ॲपवर नोंदणी करतेवेळी लोकांना काही पैसे भरावे लागत होते. नोंदणी केलेल्या लोकांना ॲपच्या माध्यमातून काही सेलिब्रिटींचे व्हीडीओ पाठविण्यात येत होते. हे व्हीडीओ या लोकांनी जर त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावरून अपलोड केले तर प्रत्येकी एका व्हीडीओसाठी या लोकांना २० रुपये देण्यात येत होते. हे पैसे या ॲपमध्ये असलेल्या त्यांच्या वॉलेटमध्ये जमा करण्यात येत होते. सुरुवातीला काही काळ लोकांना हे पैसे नियमित मिळत होते. अलीकडच्या काळात मात्र ते जमा करणे बंद झाले होते. सोमवारी ईडीने कंपनीशी संबंधित १२ ठिकाणी छापेमारी करत ही जप्तीची कारवाई केली.