गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - जगभरात कोरोना ने थैमान घालत लाखो लोकांना अद्याप गिळंकृत केले आहे. सध्या भारतात देखील हा विषाणू हातपाय पसरत असून घरात राहून सुरक्षित राहा', असे वारंवार पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, तरी देखील लोक या विनंतीला न जुमानता गर्दी करत आहे आणि वरुन 'पोलीस मारतात' अशी तक्रारही केली जात आहे. त्यानुसार 'आप पर दंडे बरसाकर हमे खुशी नही मिल रही' असे सांगत लोकांची समजूत काढणाऱ्या पोलिसांची ही क्लिप आहे. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ती चांगलीच लोकप्रिय होत आहे.
सध्या मुंबईसह देशात असाच प्रकार सुरू आहे. लोकांचा जीव वाचावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना नाईलाजास्तव लाठी उचलावी लागत आहे. मात्र त्यामागचे कारण लक्षात न घेता पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न काही लोक करत असून ही क्लिप त्यावर चोख उत्तर आहे. क्लिपच्या शेवटी उपायुक्त शिंगे पुन्हा नागरिकांनी घरात राहून स्वतःची काळजी घेण्याची विनंती करतात. ही क्लिप सध्या व्हायरल झाली असुन सत्य परिस्थिती मांडण्यात ती यशस्वी होत आहे.