मुंबई - वरळी पोलीस वसाहतीत दोन कोरोनाबाधित पोलीस आढळून आल्याने एक इमारत सील करण्यात आली. त्यापाठोपाठ बोरिवली पोलीस वसाहतीतील उपनिरीक्षकाला करोनाची लागण झाल्याने या वसाहतीतील राहीवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या संर्पकात आलेल्या पोलिसांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलीस वसाहतीसह मुंबईत ४६ पोलीस वसाहती आहेत. यात हजारो पोलीस कुटुंबिय वास्तव्यास आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी घरातील मंडळीचा विचार न करता ही मंडळी रस्त्यावर कार्यरत आहेत. कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशाची अमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, कस्तुरबा रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या, नातेवाईकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापाूसन अंत्यविधींपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या व्यक्तीची माहिती घेणे, दिल्लीतील धार्मिक संमेलनातून परतलेल्या व्यक्तींचा शोधसह विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पोलीस कुटुंबियामध्ये कोरोनाबाबत भिती वाढत आहे. त्यामुळे पोलिसांच्या स्वास्थ्याकड़े विशेष लक्ष देण्याचे विनंती पोलिसांकड़ून होत आहे.