नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील पंजाबी कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गेले कित्येक दिवस महिला नैराश्यात होती. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत: ला जाळून घेतलं आणि घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.
परिसरातील लोकांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. बलविंदर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तिचे पती अमरजीत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचा बलविंदर यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच त्या नैराश्यात गेल्य़ा होता. महिलेला दोन मुली देखील आहेत. बलविंदर यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. एका मुलाने आपल्या वडिलांच्या उपचारासाठी तब्बल 35 लाखांचं लोन घेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता संपूर्ण पगार हा EMI मध्येच जात आहे. गुजरातच्या गांधी नगरमध्ये राहणाऱ्या राजन भलाणी यांनी आपल्या वडिलांवर चांगले उपचार करता यावेत यासाठी 35 लाखांचं लोन घेतलं. राजन यांचे वडील जयेश भलाणी यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 40 दिवस गांधीनगरमधील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र याच दरम्यान त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.