पोलिसात तक्रार केल्याने नशेडीच्या आई, वहिनीने केली तक्रारदाराच्या पत्नी व बहिणीस मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:08 IST2020-09-28T19:08:37+5:302020-09-28T19:08:58+5:30
त्या नशेडीच्या आई-बहिणीने तक्रारदाराच्या घरात घुसून त्याची पत्नी व बहिणीस मारहाण केल्याची घटना पेणकर पाड्यात घडली आहे.

पोलिसात तक्रार केल्याने नशेडीच्या आई, वहिनीने केली तक्रारदाराच्या पत्नी व बहिणीस मारहाण
मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये चरस, गांजा, एमडी, गुटखा आदी विविध नशा करण्याचे प्रमाण फोफावले असताना एका तरुणास नशा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमास नशेडीने मारहाण केली. त्याची तक्रार पोलिसात केली म्हणून त्या नशेडीच्या आई-बहिणीने तक्रारदाराच्या घरात घुसून त्याची पत्नी व बहिणीस मारहाण केल्याची घटना पेणकर पाड्यात घडली आहे.
मीरा रोडच्या पेणकरपाड्यात किसननगर परिसरात राहणारे संदीप पवार ह्यांनी रविवारी सायंकाळी त्यांच्या घरासमोर नशा करत बसलेल्या दिनेश मोहिते नावाच्या तरुणास हटकले. त्याचा राग येऊन दिनेशने पवार ह्यांना धक्काबुक्की केली. पवार यांनी कशिमीरा पोलीस ठाण्यात दिनेशची तक्रार केल्याने अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. दिनेश विरुद्ध तक्रार केल्याचा राग येऊन त्याची आई आणि वहिनी रात्री पवार ह्यांच्या घरात घुसले. परंतु ते घरात नसल्याने दोघींनी पवार ह्यांची पत्नी अनिता आणि बहीण रेश्मास शिवीगाळ करत ठोश्या बुक्क्यांनी मारहाण केली. ह्यात अनिता ह्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. या प्रकरणी अनिता ह्यांच्या फिर्यादीवरून काशीमिरा पोलीस ठाण्यात दिनेशची आई व वहिनीच्याविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.