ड्रग्जमध्ये किलोमागे मोजायचे कमिशन; कस्टम आणि पोस्ट अधिकाऱ्यांचे साटेलोटे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 08:16 IST2025-05-05T08:16:12+5:302025-05-05T08:16:28+5:30
मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकारी, पोलिस अधिकारी यांनाच हाताशी धरून विदेशातून मुंबईत ड्रग्ज आणले जात होते.

ड्रग्जमध्ये किलोमागे मोजायचे कमिशन; कस्टम आणि पोस्ट अधिकाऱ्यांचे साटेलोटे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ड्रग्जमाफियांनी कस्टम, पोलिस यंत्रणाच पोखरल्याचे नवी मुंबई पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणले. विमानतळावर ड्रग्जचे पार्सल क्लियर करण्यासाठी किलोमागे कमिशन घेतले जात असल्याचे चौकशीत समोर आले. यासाठी ९० टक्के कमिशन कस्टम अधिकाऱ्याला, तर १० टक्के पोस्ट अधिकाऱ्याला दिले जात होते.
नवी मुंबईत ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्यांपैकी एक केके उर्फ कमल चांदवाणी (५६) याला अटक केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने ही साखळी उघडकीस आणली. या कारवायामुळे पाेलिस दलांमध्ये चर्चा रंगू लागली असून, आणखी किती जणांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकारी, पोलिस अधिकारी यांनाच हाताशी धरून विदेशातून मुंबईत ड्रग्ज आणले जात होते. हे ड्रग्ज विक्रीचे रॅकेट नवी मुंबईत सुरळीत चालवण्यासाठी त्याने काही पोलिसांना हाताशी धरले होते. त्यापैकी दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. ड्रग्ज तस्करांना पाठीशी घालणाऱ्या खाकीवरच हात टाकण्याचे धाडस वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने केले.
७ पोलिस पथके तयार
गौरला अटक केल्याचे समजताच रवी सुट्टी टाकून उदयपूर येथे मूळगावी निघून गेला होता. त्याचाही सहभाग निष्पन्न होताच त्याला अटक झाली. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत ११ जणांना अटक झाली आहे. इतरांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिसांनी ७ पथके तयार केली आहेत. दोन पथके राज्याबाहेरील साखळी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
...अशा व्हायच्या वाटाघाटी
अधिक चौकशीत या रॅकेटमध्ये कस्टम अधीक्षक प्रशांत गौर याला मिळालेला पोस्ट अधिकारी रवी श्रीपालला उदयपूरमधून अटक केली आहे.
चांदवणीच्या इशाऱ्यावरून तो थायलंडमधून येणाऱ्या ड्रग्जची माहिती विमानतळावरील गौर याला देऊन ते सुखरूप बाहेर काढले जायचे. यासाठी कस्टम अधीक्षक गौर याला किलोमागे कमिशन मोजले जात होते.
ड्रग्ज कोणत्या प्रकारचे आहे, त्यावरून हा आकडा निश्चित व्हायचा. त्यानुसार गौर याने किलोमागे ५० हजार ते ८० हजार घेऊन लाखो रुपये खिशात घातल्याचे समोर आले आहे.