पलावा सिटी: सोसायटीत बॉल आल्याने मुलांना बांधून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:25 IST2025-10-10T09:25:21+5:302025-10-10T09:25:40+5:30
पलावा सिटीमध्ये कासाबेला गोल्ड नावाचे गृहसंकुल आहे. त्या ठिकाणी क्रिस्टीया (ए) सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला.

पलावा सिटी: सोसायटीत बॉल आल्याने मुलांना बांधून मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : व्हॉलीबॉल खेळताना बॉल दुसऱ्या सोसायटीच्या आवारात गेला म्हणून तेथील सुरक्षारक्षकाने ११ वर्षांच्या दोन मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचा प्रकार पलावा सिटीमधील कासाबेला गोल्ड या हाय प्रोफाईल सिटीत बुधवारी घडला. राजेंद्र खंदारे (३४) या सुरक्षारक्षकाला अटक केली.
पलावा सिटीमध्ये कासाबेला गोल्ड नावाचे गृहसंकुल आहे. त्या ठिकाणी क्रिस्टीया (ए) सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला. गृहसंकुलातील गार्डनमध्ये लहान मुले व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल बाजूच्या सोसायटीत गेला. राजेंद्रने मुलांना दम देत बॉल देण्यास नकार दिला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ११ वर्षांच्या दोन मुलांना मीटर रूममध्ये कोंडण्याची धमकी दिली. दोन्ही मुलांचे हात बांधले आणि त्यांना मारहाण केली.
हा संतापजनक प्रकार इतर मुलांनी संबंधित मुलांच्या पालकांना जाऊन सांगितला असता पालक आणि अन्य रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत खंदारे याला जाब विचारला. खंदारे याने उद्धट उत्तरे देत वाद घातला. बॉल पुन्हा सोसायटीत आला तर मी यापुढेही असेच करणार अशी धमकी दिली. रहिवाशांनी याची माहिती गृहसंकुलाचे चेअरमन योगेश पाटील यांना दिली.
वाद पुढे वाढल्यावर मानपाडा पोलिसांना बोलावून खंदारेला त्यांच्या ताब्यात दिले. खंदारेने मद्य प्राशन केले होते, असा आरोप रहिवाशांनी केला. असे प्रकार घडू नयेत याची खबरदारी सुरक्षारक्षक एजन्सींनी घ्यावी, असे आवाहन रहिवाशांनी केले.