अमरावतीत दीड महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, श्वानपथक माग काढण्यात अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 22:42 IST2020-11-29T22:41:31+5:302020-11-29T22:42:11+5:30
Crime News : याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

अमरावतीत दीड महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, श्वानपथक माग काढण्यात अपयशी
अमरावती : स्थानिक न्यू प्रभात कॉलनी (एकनाथ विहार) येथून दीड महिन्याच्या चिमुकल्याचे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अपहरण करण्यात आले. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बिहार राज्यात सासर असलेली विवाहिता प्रसुतीसाठी माहेरी अमरावती येथे आली होती.
पोलीस सुत्रांनुसार, न्यू प्रभात कॉलनी येथील रहिवासी दिलीपसिंह चौहान यांची मुलगी नम्रता हिचे बिहार राज्यात सासर आहे. प्रसूतीसाठी दीड महिन्यांपूर्वी तिला माहेरी आणले. तिने मुलाला जन्म दिला. दीड महिन्याच्या चिमुकल्या धैर्यला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घराच्या पुढील खोलीत नम्रता ही खेळवत होती. यावेळी घरी कुणीही नव्हते. काही कामासाठी नम्रता ही आतल्या खोलीत गेली. बाहेर आल्यानंतर धैर्य जागेवर व घरात कुठेच दिसत नसल्याचे पाहून तिने आरडाओरड केली. यानंतर ही माहिती कुटुंबीयांमार्फत पोलिसांना देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने चिमुकल्याचे अपहरण केल्याची तक्रार देण्यात आली.
पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तपासाला प्रारंभ केला. या ठिकाणी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून ३०० मीटर अंतरावरील रेल्वे अंडरपासपर्यंत माग काढला आणि पुन्हा घटनास्थळ गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.
चिमुकल्याच्या तपासाकरिता पोलिसांची दोन पथके व चाईल्ड हेल्पलाईनचे एक पथक गठित करण्यात आले आहे. बाळाच्या वडिलांना बिहारहून बोलावण्यात आले आहे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती