पिंपरी : पती रेल्वेत अधिकारी आहेत, तुम्हाला रेल्वेत नोकरी लावते, असे अमिष दाखवून एका महिलेने तीन तरूणांकडून साडेसात लाख रुपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट २०१८ ते २० जून २०१९ या कालावधीत हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी अक्षय रोहिदास भिंताडे (वय २५, रा. कासारसाई, मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्मिता लक्ष्मण मोहिते, महेश उर्फ बंडू जाधव (रा. न्यु. बॉम्बे हॉटेलचे मागे, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्मिता मोहितेने मी सरकारी नोकरी करत असून माझे पती रेल्वेमध्ये अधिकारी आहेत असे सांगितले. तिघांना रेल्वे खात्यात नोकरीला लावण्याचे सांगून प्रत्येकी अडीच लाख रुपयाप्रमाणे साडेसात लाख रुपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. फिर्यादीला आरोपीने साडेसात लाख रुपयांचे चेक दिले मात्र ते बाउन्स झाले. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पिंपरीत नोकरी लावण्याच्या अमिषाने साडेसात लाखांची फसवणुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 19:33 IST