जादा व्याजाच्या आमिषाला भुलले अन्...; आतापर्यंत १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 23:04 IST2021-08-10T23:04:32+5:302021-08-10T23:04:53+5:30
चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहत होता.

जादा व्याजाच्या आमिषाला भुलले अन्...; आतापर्यंत १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड
डोंबिवली- आर्थिक व्यवहार करताना जादा व्याजाच्या आमिषाला भुलून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. डोंबिवलीमध्येही ही अशीच एक घटना घडली असून शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेऊन एक युवक पसार झाला होता. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंकेश जैन ( वय 25) असे या महाठगाचे नाव असून त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहत होता. चंकेश याने अनेक जणांना मी शेयर बाजारात गुंतवणूक करतो, तुमचे पैसे शेयर बाजारात गुंतवा मी तुम्हाला 8 ते 10 टक्के व्याजाने पैसे परत करतो असे आमिष दाखवले. बक्कळ व्याजाच्या आमिषाला भुलून अनेक जणांनी चंकेशला पैसे दिले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदला दिला.
अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र तो डोंबिवलीतून अचानक बेपत्ता झाला. चंकेशचा फोन लागत नव्हता त्याने दिलेल्या पत्त्यावर देखील राहत नव्हता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर चंकेशला गाझियाबादमधून अटक करण्यात आली. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.