Bihar Crime: ' पुढची बातमी पोलीस आणि गुंडांच्या चकमकीत १०-१५ पोलीस मारले गेले अशी असेल', अशी उघड धमकी देणाऱ्या कुख्यात गँगस्टर कुंदन ठाकूरचा बिहारपोलिसांनी अखेर खात्मा केला आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या या भीषण चकमकीत कुंदन ठाकूरसह त्याचे दोन साथीदार ठार झाले, मात्र दुर्दैवाने या धुमश्चक्रीत ३१ वर्षीय पोलीस जवान श्री राम यादव यांना वीरमरण आले.
ऑडिओ क्लिप व्हायरल अन् पोलिसांचं 'मिशन मोतिहारी' सुरू
गँगस्टर कुंदन ठाकूरने एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून थेट आव्हान दिले होते. "गुंडगिरी काय असते ते मी पूर्ण शहराला दाखवून देईन, मी पळणारा नाही तर लढणारा माणूस आहे, दोन्ही हातांनी गोळ्या चालवू शकतो. हिम्मत असेल तर मला जिवंत पकडून दाखवा," अशी धमकी त्याने दिली होती. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. मोतिहारीचे पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात यांनी तात्काळ एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक तयार करून कुंदनच्या शोधात शोधमोहीम राबवली. त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कोणतीही कारवाई करु नये म्हणून पोलिसांना धमकीही दिली होती.
गोळीबाराने हादरला परिसर
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामडिहा गावातील एका घरावर छापा टाकला, जिथे कुंदन ठाकूर आपल्या साथीदारांसह लपला होता. पोलिसांनी घराला वेढा घातल्याचे लक्षात येताच गुंडांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात कॉन्स्टेबल श्री राम यादव गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात गँगस्टर कुंदन ठाकूर आणि मुजफ्फरपूरचा त्याचा साथीदार प्रियांशु कुमार ऊर्फ प्रियांशु दुबे हे दोघेही गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
बाप-लेकाला बेड्या, शस्त्रास्त्रांचा साठा जप्त
चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी उज्ज्वल कुमार आणि संत कुमार तिवारी या बाप-लेकाला अटक केली आहे. हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर आर्म्स ॲक्टसह अनेक गुन्हे दाखल आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी १ कार्बाइन, २ पिस्तूल, २ देशी कट्टे, ५ जिवंत काडतुसे जप्त केली.
२० वर्षांचा गँगस्टर अन् गुन्हेगारीचा काळा इतिहास
ठार झालेला कुंदन ठाकूर अवघ्या २० वर्षांचा होता, मात्र २०१९ पासूनच त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टचे ५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. चकिया आणि आसपासच्या परिसरात त्याची मोठी दहशत होती. चंपारण रेंजचे डिआयजी हर किशोर राय यांनी सांगितले की, शहीद जवानाच्या कुटुंबाला सरकारी नियमानुसार सर्व मदत आणि भरपाई त्वरित दिली जाईल.
Web Summary : Bihar police eliminated gangster Kundan Thakur after his threats. A policeman, Shri Ram Yadav, died in the encounter. Two accomplices were also killed. Police recovered weapons and arrested two others, revealing Thakur's criminal history despite his young age.
Web Summary : बिहार पुलिस ने धमकी देने वाले गैंगस्टर कुंदन ठाकुर को मार गिराया। मुठभेड़ में पुलिसकर्मी श्री राम यादव शहीद हो गए। दो साथी भी मारे गए। पुलिस ने हथियार बरामद किए और दो अन्य को गिरफ्तार किया, जिससे ठाकुर का आपराधिक इतिहास सामने आया।