Car Theft: तामिळनाडूतून कारचोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नई पोलिसांनी राजस्थानमधील एका चोराला अटक केली. हा चोर गेल्या २० वर्षांपासून चोरी करत होता. त्याने आतापर्यंत १०० हून अधिक आलिशान गाड्या चोरुन विलासी जीवन जगला. तो तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी अशा अनेक राज्यांमधून आलिशान गाड्या चोरायचा अन् राजस्थान आणि नेपाळमध्ये विकायचा.
चेन्नईतील अण्णा नगरमध्ये झालेल्या चोरीमध्ये त्याचा पर्दाफाश झाला. पुद्दुचेरीमध्ये लपलेल्या कार चोराची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले. दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी सतेंद्र शेखावतला पकडले आणि चौकशीसाठी चेन्नईला नेले. त्यानंतर न्यायालयात त्याला तुरुंगात पाठवले आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या चोरीतून खुलासामिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या अण्णा नगरमधील कथिरावन कॉलनीत राहणारा एथिराज रथिनम याने गेल्या महिन्यात त्याची महागडी आलिशान कार घराच्या दाराशी पार्क केली होती. पहाटे एक माणूस आला अन् त्याने गाडी चोरली. आपल्या डोळ्यासमोर आपली गाडी चोरीला जाताना पाहून इथिराजला धक्का बसला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे त्याने तिरुमंगलम पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
MBA पदवीधर चोरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराचा शोध सुरू केला. तपासात संशयित पुडुचेरीमध्ये लपून बसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन राजस्थानच्या सतेंद्र सिंग शेखावतला अटक केली. तपासात असे दिसून आले की, सतेंद्र हा MBA पदवीधर असून, त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. गेल्या २० वर्षांपासून सतेंद्र आधुनिक उपकरणांचा वापर करून तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीसह अनेक राज्यांमधून आलिशान गाड्या चोरत होता आणि नंतर त्या राजस्थान आणि नेपाळमध्ये विकून पैसे कमवत होता.
आतापर्यंत त्याने १०० हून अधिक आलिशान गाड्या चोरल्या आहेत आणि त्या विकून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांनी आलिशान जीवन जगत होता. आता इतक्या वर्षांनंतर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.