UP Crime:उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथील बांके बिहारी कॉरिडॉरसाठी कोट्यवधीचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या व्यापाऱ्याला फसवणूकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. बांके बिहारी कॉरिडॉरसाठी ५१० कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या आग्रा येथील बिल्डरला ९ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बिल्डर आणि त्याच्या पत्नीला आग्रा पोलिसांनी जयपूर येथून अटक केली. दोघेही जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते. त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते, पण तो पोलिसांना गुंगारा देऊन ऐशोआरामात जगत होता.
आग्रा येथील कमला नगर परिसरात राहणारा प्रखर गर्ग हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे. त्याने त्याच्या ओळखीच्या अरुण सोंधीची कोट्यवधींची फसवणूक केली होती. प्रखर गर्गने अरुण सोंधीसोबत हॉटेलसाठी एक करार केला होता. त्या बदल्यात अरुण सोंधी यांनी प्रखर गर्गला ९ कोटी रुपये दिले होते. पण प्रखर गर्गने हॉटेलचीच नोंदणी न केल्याने अरुण यांनी त्यांचे पैसे परत मागितले. मात्र गर्ग हा पैसे देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करत होता. बराच वेळ टाळाटाळ केल्यानंतर त्याने अरुण यांना २ कोटी रुपयांचे चेक दिला मात्र तोसुद्ध बँकेतून बाउन्स झाला. त्यामुळे अरुण सोंधी यांनी २०२४ मध्ये प्रखर गर्ग, त्यांची पत्नी राखी गर्ग, सुमित कुमार जैन, सतीश गुप्ता आणि मुकेश जैन यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.
कोर्टाने प्रखर गर्ग आणि राखी गर्गसह आरोपींना अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र काही कारणांमुळे गर्गला अटक केली जात नव्हती. मात्र प्रकरण वाढत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांची निवड केली आणि एक टीम तयार केली. पोलिसांना गर्ग जयपूरमध्ये असल्याची टीप मिळाली होती. प्रखर गर्ग आणि त्याची पत्नी राखी गर्ग एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होते. पोलिसांनी धाड टाकून दोघांनाही अटक केली.
प्रखर गर्ग आणि त्याची पत्नी राखी गर्ग यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली . काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अंतिम अहवालही दाखल केला आहे. मार्च २०२२ मध्येच, प्रखर गर्ग आणि त्यांच्या साथीदारांनी ईडीने जप्त केलेले संजय प्लेस येथील नोव्हा हॉटेल २.१९ कोटी रुपयांना विकण्याचा कट रचला होता. हॉटेलची खरेदी झाल्यानंतर पाच दिवसांनी ईडीचे पथक नोटीस चिकटवण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, प्रखर गर्ग याने बांके बिहारी कॉरिडॉरच्या बांधकामासाठी ५१० कोटी रुपये देण्याचे प्रतिज्ञापत्र सरकारला दिले होते. पण ते स्वीकारण्यात आले नाही. इतक्या मोठ्या देणगीची घोषणा केल्याने गर्ग चर्चेत आला होता. त्याने मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यासोबत कुंभमेळ्यात स्नानही केले होते ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.