संतापजनक! नर्सरीतील चिमुरडीवर बसचालकाचा बलात्कार; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 06:01 IST2022-09-14T06:01:12+5:302022-09-14T06:01:53+5:30
साडेतीन वर्षांची ही चिमुरडी खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेनंतर ती घरी येत असताना ही घटना घडली.

संतापजनक! नर्सरीतील चिमुरडीवर बसचालकाचा बलात्कार; दोघांना अटक
भोपाळ : नर्सरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीवर शाळेच्या नराधम बसचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे घडली. पोलिसांनी चालकासह महिला सहायकाला अटक केली आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी घटना घडली तेव्हा ही महिला सहायक बसमध्ये होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
साडेतीन वर्षांची ही चिमुरडी खासगी शाळेत शिकते. गुरुवारी शाळेनंतर ती घरी येत असताना ही घटना घडली. मुलगी घरी आल्यानंतर कोणीतरी तिचे कपडे बदलल्याचे आईच्या लक्षात आले. आईने मुलीचे वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे याबाबत चौकशी केली.
मात्र, दोघांनीही मुलीचे कपडे बदलल्याचा इन्कार केला. नंतर मुलीने गुप्तांगात वेदना होत असल्याचे सांगितले. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला. शाळेच्या बसचालकाने बसमध्ये अत्याचार केला आणि नंतर आपले कपडे बदलले, असे तिने पालकांना सांगितले.
शाळेच्या भूमिकेची चौकशी : गृहमंत्री
तक्रार प्राप्त झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत विचारले असता शाळा प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी केली जाईल. शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे मलाही वाटते, असे ते म्हणाले.