अमरावतीच्या घनशामनगरात घरफोडी, १० लाखांचे सोने, रोख लांबविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:28 IST2023-03-24T20:28:45+5:302023-03-24T20:28:57+5:30
दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घरफोडीची घटना उघडकीस

अमरावतीच्या घनशामनगरात घरफोडी, १० लाखांचे सोने, रोख लांबविले
अमरावती: स्थानिक सातुर्णा रोडवरील घनशाम नगरात चोरांनी भर दुपारी केवळ तासभरात एका घरातील सोन्याचे दागिने व रोख असा एकूण आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घरफोडीची घटना उघडकीस आली.
सराफा बाजारातील भांडे व्यावसायिक हरि प्रेमचंद पुरवार (५५) यांचे घनशामनगरात घर आहे. शुक्रवारी दुपारी हरी पुरवार यांची पत्नी घरी होत्या, तर ते दुकानात गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी काही कामानिमीत्त घराबाहेर गेली असता, चोराने त्यांच्या घरातील मागील दारातून प्रवेश करून त्यांच्या घरातील दोन किलो वजनाची चांदी, १६० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ८० हजारांची रोख असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली.
दरम्यान, श्वान हे साईनगर परिसरापर्यंत पोहोचले होते. रात्री उशिरा या घटनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त विक्रम साळी, एसीपी भारत गायकवाड व ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली.