डाॅक्टरची दुचाकी पळविणारे बंटी-बबली पोलिसांच्या ताब्यात
By साईनाथ कुचनकार | Updated: May 15, 2023 23:03 IST2023-05-15T23:03:32+5:302023-05-15T23:03:42+5:30
रुग्णालय परिसरातून पळविली दुचाकी : पोलिसांनी घेतला सीसीटीव्हीचा आधार

डाॅक्टरची दुचाकी पळविणारे बंटी-बबली पोलिसांच्या ताब्यात
साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: ग्रामीण रुग्णालयात ठेवलेली दुचाकी संधी साधत बंटी-बबलीने पळवून नेली. ही घटना सी.सी. टिव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली.
येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका डॉक्टरने आपली दुचाकी क्र. एम. एच. ३३ एल. ५५५७ ही दि. ८ मे ला सकाळी १० वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात ठेवली. काम आटोपल्यानंतर ज्या ठिकाणी दुचाकी ठेवली होती. तिथे दिसून आली नाही. त्यांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या सी. सी. टिव्हीचे फुटेज तपासले. यामध्ये एक महिला व पुरुष दुचाकी पळवून नेत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत सुषमा विशाल चाचेरकर (३५) रा. भवानी वार्ड हिला दुचाकीसह तिच्या राहत्या घरून अटक केली. तिची कसून चौकशी केली असता सोबतचा इसम सादम कादेर हलदार (३१) रा. सिकंदरपूर (प. बंगाल) येथील रहिवासी असून तो तिच्या घरी राहतो. मात्र, तो स्वगावी पळून गेल्याने पोलिसांनी त्याला प. बंगाल येथून अटक केली. अवघ्या काही तासातच पोलिसांनी बंटी - बबलीचा शोध घेतल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.