परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत

By जितेंद्र कालेकर | Updated: August 23, 2025 01:12 IST2025-08-23T01:12:12+5:302025-08-23T01:12:37+5:30

शरद आणि शुभम अग्रवाल यांना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक

Builder who accused Parambir Singh of extortion booked for fraud Agarwal brothers arrested | परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गृहरक्षक दलाचे तत्कालीन पाेलिस महासंचालक तथा ठाण्याचे माजी पाेलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर चार काेटी ६८ लाखांच्या खंडणीचा आराेप करणारे भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक शरद आणि शुभम अग्रवाल या दाेन भावांसह पाच जणांविरुद्ध ठाणेनगर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शरद आणि शुभम अग्रवाल या दोन भावांना अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली.

भाईंदरचे रहिवासी बळवंत पाटील यांनी याबाबत ठाणेनगर पाेलिस ठाण्यात २० ऑगस्टला तक्रार दाखल केली. १४ नाेव्हेंबर २००८ ते १५ सप्टेंबर २०११ या कालावधीत दीनानाथ गावडे, हर्षद गावडे, शामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांनी संगनमत केले. बळवंत यांची आई कृष्णाबाई पाटील हिच्या वडिलाेपार्जित नवघर येथील १८ हजार ४९० चाैरस मीटर जमिनीवर वारसदारांच्या नाेंदी असल्याची माहिती असतानाही गंगाधर गावडे, प्रेमाबाई भगत, लक्ष्मी मनेरा, मथुराबाई घरत आदी नऊ जणांनी १० सप्टेंबर २००३ राेजी दीनानाथ गावडे आणि हर्षद गावडे यांना पाॅवर ऑफ ॲटर्नी दिलेली असतानाही तिचा दुरूपयाेग करून फेरफार केले. त्याच पाॅवर ऑफ अटर्नीमधील दीनानाथ गावडे यांच्या नावाऐवजी शामसुंदर अग्रवाल यांचे नाव टाकले. परवानगी न घेताच ही मालमत्ता शुभम, शरद अग्रवाल यांना विक्री केल्याची कागदपत्रे तयार केली. सातबाऱ्यात माैजे नवघर ऐवजी गाेडदेव केले.

मिळकतीचा व्यवहार केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांचे १० सप्टेंबर २०११ चे पत्रही शासनाची दिशाभूल करून मिळवले. पाटील यांच्या कुटुंबीयांनी या जमिनीची विक्री केलेली नसतानाही त्यांना माेबदला न देताच त्यांची ही मालमत्ता हडप केल्याचे तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: Builder who accused Parambir Singh of extortion booked for fraud Agarwal brothers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.