पती-पत्नी आणि 'वो' यांची अनेक प्रकरणे आजवर नक्कीच कानावर आली असतील. पण झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत म्हणजेच जीजूसोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. पतीने आपल्या पत्नीला आणि साडूला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोडियाहाट येथील मुर्गाबनी गावात सहबुल (२८) हा सोमवारी रात्री उशिरा मजुरी करून घरी परतला. घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला, मोसीना बीबीला, तिचा जीजू (मोसीनाच्या बहिणीचा नवरा) अंसारीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे दृश्य पाहून सहबुलचा पारा चढला. त्याने संतापाने दोघांनाही प्रश्न केले.
पतीला अचानक समोर पाहून मोसीना हादरली. तिने तात्काळ पतीचे पाय धरले आणि माफी मागू लागली. मात्र, माफी मागण्याच्या बहाण्याने तिने सहबुलचे पाय ओढून त्याला खाली पाडले. त्याच क्षणी तिथे धावत आलेल्या अंसारीने सहबुलचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह घराबाहेर फेकून दिला.
१० वर्षांच्या मुलाने उघड केले रहस्य
या घटनेनंतर मृताचा १० वर्षांचा मोठा मुलगा अताउलने लोकांच्या मदतीने संपूर्ण घटना उघडकीस आणली. त्याने सांगितले की, आई आणि मौसा यांनी त्याला धमकी दिली होती की, जर त्याने पोलिसांना काही सांगितले तर त्यालाही जीवे मारतील. मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच एसआय मुकेश कुमार आणि रजनीश कुमार पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सहबुलच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेतला आणि आरोपी पत्नी मोसीना बीबीला अटक केली.
पत्नी अटकेत, प्रियकर-मेहुणा फरार
सहबुलचे लग्न २०१० मध्ये बांका रानीडीह, फुदन टोला येथील मोसीनासोबत झाले होते. त्यांना १० वर्षांचा अताउल आणि ५ वर्षांचा आणखी एक मुलगा, असे दोन मुलगे आहेत. मोसीनाचे तिच्या जीजू अंसारीसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. सध्या मोसीना पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी सुरू आहे, तर फरार झालेल्या अंसारीचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.