राजस्थानमधील बारमेरमध्ये फेसबुकवरून सुरू झालेल्या लव्हस्टोरीचा अत्यंत भयंकर शेवट झाला आहे. झुंझुनू येथील अंगणवाडी सुपरवायजर मुकेश कुमारी तिचा बॉयफ्रेंड शिक्षक मानारामला भेटण्यासाठी बारमेरला ६०० किमी प्रवास करून आली. पण इथे तिने प्रेमाच्या ऐवजी आपला जीव गमावला. लग्नाच्या दबावापासून वाचण्यासाठी बॉयफ्रेंडने लोखंडी रॉड मारून तिची हत्या केली आणि मृतदेह गाडीत ठेवून अपघात झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.
चवा गावातील रहिवासी शिक्षक मानाराम याची ऑक्टोबर २०२४ मध्ये फेसबुकवर ३७ वर्षीय मुकेश कुमारीशी मैत्री झाली. ही मैत्री हळूहळू भेटीगाठी आणि प्रेमात बदलली. मुकेश कुमारी अनेकदा झुंझुनूहून बारमेरला मानारामला भेटण्यासाठी येत असे. आरोपी मानाराम विवाहित आहे आणि त्याच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमारीने मानारामवर लग्नासाठी दबाव आणला होता आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
१० सप्टेंबर रोजी ती झुंझुनूच्या चिदावा येथून तिच्या कारने बारमेरला पोहोचली आणि बॉयफ्रेंडच्या कुटुंबाला भेटण्याचा आग्रह धरला. यानंतर ती चवा पोलीस स्टेशनलाही पोहोचली. पोलिसांनी दोघांनाही बोलावून समुपदेशन केलं आणि त्यानंतर दोघेही बारमेरला परतले. बारमेरला आल्यानंतर मानारामने बलदेव नगरजवळील शिवाजी नगरमधील एका खोलीत मुकेश कुमारीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली.
आरोपीने मृतदेह महिलेच्या अल्टो कारच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवून तो अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. तो रात्रभर आरामात झोपला आणि सकाळी उठला आणि त्याच्या वकिलाला कारमधील मृतदेहाची माहिती दिली. त्यानंतर, वकिलाने पोलिसांना माहिती दिली. मुकेश कुमारीने ९-१० वर्षांपूर्वी तिच्या पतीला घटस्फोट दिला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.