हृदयद्रावक...! मुलाला तलावात बुडताना पाहून आई, बहीण धावली; तिघेही बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 20:17 IST2020-03-04T20:11:52+5:302020-03-04T20:17:28+5:30
नागपूरातील मायलेकांचा बोरकन्हार येथे तलावात बुडून मृत्यू

हृदयद्रावक...! मुलाला तलावात बुडताना पाहून आई, बहीण धावली; तिघेही बुडाले
गोंदिया : तलावात शौचाला गेलेल्या मुलाला बुडत असताना बघून त्याची आई मदतीला धावली. मात्र, तिचा देखील तोल गेल्याने ती बुडत असल्याचे बघून मुलगी मदतीकरिता धावली. मात्र ती देखील बुडाली. अशा एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज(ता. ४) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे बाबूलाल शरणागत यांच्याकडे लग्न समारंभ होता. त्या समारंभात सहभागी होण्याकरिता मुक्ता पटले ( ३५ रा. नागपूर) या सहभागी झाल्या होत्या. आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुक्ता पटले यांचा मुलगा आदित्य पटले( १३) तलावात शौचाकरिता गेला. शौच झाल्यानंतर तो धुण्याकरिता तलावात उतरला. मात्र त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. आपल्या मुलाला वाचविण्याकरिता मुक्ता पटले पाण्यात उतरल्या. मात्र पाणी खोल असल्याने त्या देखील बुडत होत्या. हे बघताच मुक्ता पटले यांची मुलगी काजल पटले(वय १०) आईला वाचविण्याकरिता धावली. मात्र, ती देखील आपली आई आणि भावासह तलावात बुडाली.
या घटनेमुळे एकच शोककळा पसरली. यासंदर्भात प्रत्यक्षर्शींना विचारपूस केली असता तिन्ही मायलेक परतले नसताना त्यांचा शोध घेतला असता तलावाच्या काठावर लोटा दिसून आला. त्यामुळे स्थानिक ढिवरांच्या मदतीने तलावात जाळ टाकली असता मृतदेह बाहेर निघाले. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.