खळबळजनक! FB Live करत आईवडिलांसह मुलानं स्वत:चं आयुष्य संपवलं, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:02 IST2022-01-11T15:01:33+5:302022-01-11T15:02:17+5:30
स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला घेऊन गेले.

खळबळजनक! FB Live करत आईवडिलांसह मुलानं स्वत:चं आयुष्य संपवलं, कारण...
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. कुटुंबाला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे हे टोकाचं पाऊल उचलण्यात आले आहे. कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह करत याबद्दल सांगितले. या घटनेनंतर परगाना जिल्ह्यातील बकखाली परिसरात खळबळ माजली आहे. ८ जानेवारीला एका जंगलात जात कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
कुटुंबाने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्ह सुरुच ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना आढळले की, मृतकांमध्ये अशोक नस्कर, त्यांची पत्नी रिता नस्कर आणि मुलगा अभिषेक नस्कर यांचा समावेश आहे. अशोक आणि रिता यांची मुलगी पूनम एका संस्थेशी जोडलेली आहे. तिच्यावर संस्थेचे १४ लाख रुपये हडपल्याचा आरोप करण्यात आला. ८ जानेवारीला सकाळी संस्थेच्या काही महिला नस्कर कुटुंबाच्या घरी पोहचल्या. महिलेने पूनम आणि तिच्या घरच्यांना अपमानित केले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, स्वनिर्भर गोष्ठीच्या संस्थेतील महिलांनी सुरुवातीला पूनमला घरातून बाहेर काढलं आणि तिला घेऊन गेले. त्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही घराबाहेर काढत घराला कुलूप लावलं. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम आणि तिच्या पतीला रस्सी बांधून संपूर्ण गावात फिरवले गेले. तसेच एका झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत कळालं की, याच अपमानामुळे अशोक, रिता आणि अभिषेक या तिघांनी एका जंगलात जात आत्महत्या केली. सध्या पूनमला पोलिसांनी रेस्क्यू केले आहे. जेव्हा या घटनेचा फेसबुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तेव्हा पोलिसांना याची माहिती कळाली. पोलिसांनी या प्रकरणात स्वनिर्भर संस्थेच्या ५ महिलांना ताब्यात घेतले असून आणखी काहींची चौकशी करण्यात येत आहे.