Both charged with killing a dog; Types at Panvel | श्वानाची कत्तल केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; पनवेल येथील प्रकार

श्वानाची कत्तल केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; पनवेल येथील प्रकार

पनवेल : तक्का येथील रेनायसन्स ट्विन्स सोसायटीत श्वानाच्या पिल्लाची हत्या केल्याप्रकरणी सोसायटीमधील रहिवासी व सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रकाराची तक्रार प्राणिमित्र विजय रंगारे यांनी दिली आहे.

तक्का येथील ज्या रेनायसन्स ट्विन्स हा प्रकार घडला, त्या रहिवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवासी नूरजहां खान यांनी प्राण्यांसाठी काम करणारे आणि पीपल फॉर अनिमल्स मुंबई युनिट विजय रंगारे यांना फोन करून सोसायटीमध्ये श्वानाला मारहाण झाली असून, एक श्वानाच्या पिल्लू यामध्ये मृत पावले असल्याचे फोनद्वारे सांगितले. संबंधित घटनेची शहानिशा करण्यासाठी रंगारे हे तक्का येथील रेनायसन्स ट्विन्स सोसायटीत दाखल झाल्यानंतर, त्यांना या सोसायटीच्या आवारात एक श्वानाचा पिल्लू मृत पावलेले व दोघेजण जखमी असल्याचे आढळले. 

यावेळी रंगारे यांनी तत्काळ प्राणिमित्र संघटनेची रुग्णवाहिका बोलावून जखमी श्वानांवर तत्काळ उपचार सुरू केले. या घटनेत मृत पावलेल्या श्वानाबद्दल माहिती घेण्यासाठी रंगारे यांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही तपासले असता, एक ३० ते ३५ वयोगटांतील माणूस या श्वानांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत असल्याचे दिसून आले. संबंधित व्यक्तीला सोसायटीचा सुरक्षारक्षक मदत करीत असल्याचे दिसून आले. या घटनेत एक श्वान मृत्युमुखी पावला, तर दोन श्वानाची पिल्ले जखमी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, यापैकी एक व्यक्ती सोसायटीमधील रहिवासी नरेंद्र ठाकूर व दुसरा व्यक्ती सुरक्षारक्षक रामदूत तिवारी असल्याचे समजले. रंगारे यांनी या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघांवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोटीस बजावण्यात आली
या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी दिली.

 

Web Title: Both charged with killing a dog; Types at Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.