बचावासाठी लाच देण्याचा जयसिंघानी यांचा प्रयत्न, न्यायालयाने नोंदविले निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 07:30 IST2023-04-05T07:29:57+5:302023-04-05T07:30:16+5:30
अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळला

बचावासाठी लाच देण्याचा जयसिंघानी यांचा प्रयत्न, न्यायालयाने नोंदविले निरीक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुन्ह्यातून वाचण्यासाठी बुकी अनिल जयसिंघानी व त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तसे करण्यास नकार दिल्यावर पिता-पुत्रीने त्यांना खासगी मेसेज पाठवून धमकावण्याचा व खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचे विशेष न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळताना सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाचे न्या. दीपक अलमाले यांनी १ एप्रिलला अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला. अनिल व अनिक्षाने कट रचला. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून वडिलांना प्रलंबित गुन्ह्यांतून वाचविण्यासाठी त्यांची मदत मागितली. कारण त्यांचे पती देवेंद्र फडणवीस लोकसेवक आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सरकारी वकिलांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा तक्रारदाराने (अमृता) अनिक्षाच्या म्हणण्यानुसार वागण्यास नकार दिला तेव्हा तिने तक्रारदाराच्या मोबाईलवर व्हिडिओ, व्हाईस नोट आणि स्क्रीन शॉट पाठवून १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला, असेही न्यायालयाने म्हटले. १७ प्रकरणे अनिल जयसिंघानीवर प्रलंबित आहेत. जामिनावर सुटका केली तर तो फरार होऊ शकतो असे न्यायालय म्हणाले.