पंजाबच्या जोगिंद्रनगर इथं २२ वर्षीय निशा सोनीच्या संशयास्पद मृत्यूनं खळबळ माजली आहे. गुरुवारी मच्छयाल येथील स्मशान भूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरूण वयात मुलीच्या अचानक जाण्यानं कुटुंबाला धक्का बसला. आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. निशा सोनीने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केलेत ज्यातून ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी होती असंच दिसून येते.
निशाच्या संशयास्पद मृत्यूवर तिचे वडील हंसराज सोनी यांनी अनेक खुलासे केलेत. वडिलांनी आरोपीने २ तास मुलीला फोन करून धमकी दिली त्यानंतर प्लॅनिंग करून तिची हत्या करत मृतदेह पटियाला जवळील कालव्याजवळ फेकला. मुलीच्या अंगावरचे दागिनेही काढले. मोबाईल फोनही तोडून त्यातील पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. पंजाब पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतंय. मुलीला न्याय देण्याची मागणी पुढे झाली तेव्हा पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दखल घेतल्याचं त्यांनी सांगितले.
तर माझ्या बहिणीला मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी आली होती. काही तासांनी तिचा मृतदेह सापडला ते पाहून आम्हाला धक्का बसला असं तिच्या बहिणीने सांगितले. २० जानेवारीला निशा चंदीगड इथं एअरहोस्टेस प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी तिचा एकांतात पकडून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. २१ जानेवारीला पटियाला येथे निशाचा मृतदेह सापडला. या हत्या प्रकरणातील आरोपी ३३ वर्षीय युवराज सिंह असून तो मोहाली येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. निशाचं एअरहोस्टेस बनण्याचं स्वप्न १० दिवसांनी पूर्ण होणार होतं, परंतु त्याआधीच युवराजनं तिची हत्या केली.
काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेशला राहणाऱ्या निशा सोनीची तिच्या पोलीस जवान मित्राने हत्या केली. २० जानेवारीला निशा युवराजसह घरातून निघाली होती मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. युवराजनं तिची हत्या केल्याचा आरोप घरच्यांनी केला. युवराज स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगत निशाशी मैत्री केली. मात्र तो विवाहित होता आणि त्याची पत्नी ऑस्ट्रेलियाला राहते असं सांगण्यात येते. तपासात आरोपी कॉन्स्टेबलने युवती कालव्यात बुडत असल्याचा कॉल पोलिसांना केल्याचं पुढे आले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.