नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर ११३ इथं एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. या महिलेच्या भावाने पती, सासू-सासऱ्यांसोबत ४ जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हुंड्यासाठी छळ करून महिलेची हत्या करण्याचा आरोप या चौघांवर लागला आहे. पोस्टमोर्टमनंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला आहे. या महिलेचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचं पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
गाझियाबादच्या नेहरू नगर येथील अनमोल गोयलची मोठी बहीण दीपिका गोयलचं लग्न फेब्रुवारी २०२३ साली नोएडा येथे राहणाऱ्या आदित्यसोबत झाले होते. बहिणीच्या सासरचे लोक गाडी आणि घरासाठी तिचा छळ करायचे. पती आदित्य माझ्या बहिणीला मारहाण करायचा. बुधवारी संध्याकाळी ४ वाजता तिचा व्हिडिओ कॉल आला होता. रात्री पावणे नऊ वाजता एका ग्रुपवर बहिणीने बाय, सॉरी आणि आय लव यू मेसेज केला होता. हे सर्व मेसेज पती आणि तिच्या सासू सासऱ्यांनी टाइप करून पाठवले होते. आम्ही बहिणीला फोन केला तेव्हा ती बाहेर गेल्याचे आम्हाला सांगण्यात आले असं त्याने आरोप केला.
त्यानंतर रात्री १० वाजता दीपिकाने गळफास घेतल्याचे कळले. आम्ही हॉस्पिटलला पोहचलो तेव्हा दीपिकाने जीव सोडला होता. या घटनेबाबत पोलिसांना हॉस्पिटलमधून फोन आला. महिलेने गळफास घेतल्याचे सांगितले गेले. या महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम करून मृतदेह घरच्यांना सोपवला. भावाच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने फास घेतल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये कारण पुढे आले. मात्र पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत.
आदित्य आणि दीपिकाचे लग्न २०२३ मध्ये झाले होते. आदित्य ग्रेटर नोएडा येथे बेबी प्रोडक्ट व्यवसाय करत होता. लग्नाच्या काही महिन्यातच या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून सातत्याने वादाचे प्रसंग घडत होते. ही महिला इंजिनिअर होती. घटनेच्या दिवशी दीपिकाने तिच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल केला होता. त्यात पतीही सोबत होता. तेव्हा सामान्यपणे आमचे बोलणे झाले. परंतु पती, सासू सासऱ्यांनी घर आणि गाडीबाबत दीपिकाच्या घरच्यांना मेसेज केला होता असा आरोप आहे.