OYO: पोलीस ठाण्यात कॉल आला की, ओयो हॉटेलमधील एका रुममध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हरयाणातील केथल येथील रहिवासी आहे. चिराग सिंह असे या तरुणाचे नाव आहे. दिल्लीतील रोहणी भागातील मंगे राम पार्क परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या रुमची झाडाझडती घेतली. त्याचबरोबर हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात सुरूवात केली आहे. तरुणाच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत.
तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल अद्याप चर्चा असून, प्राथमिक तपासात हे हत्येचं प्रकरण दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.