Crime News In Marathi: भाजप नेता एमएस शाह याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पोक्सो गुन्ह्यात ही अटक करण्यात आली आहे. भाजपचा हा नेता तामिळनाडूतील मदुरै येथील आहे. पोलिसांनी हे प्रकरण गेल्यावर्षी बंद केले होते. पण, आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवला होता. या मोबाईलमुळे अत्याचाराच्या प्रकरणाला वाचा फुटली आणि पोलिसांनी भाजप नेत्याला अटक केली. कारण या मोबाईलमधूनच बलात्कार प्रकरणाशी संबंधित पुरावे पोलिसांच्या हाती लागले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरोपी एमएस शाह हा मुदुरै येथील असून, माजी नगरसेवक आहे. तो भाजपचा स्थानिक नेता आहे. शाह याचे थिरुमंगलम येथे एक महाविद्यालयही आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, एमएस शाह हा तामिळनाडू भाजपच्या राज्यस्तरीय इकॉनॉमी विंगचा मदुरै येथील प्रमुख आहे. त्याला १३ जानेवारी रोजी ऑल वूमन पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली.
पीडित मुलीच्या आईचे आरोपीसोबत विवाहबाह्य संबंध
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलाने तक्रार दिली होती. पीडितेच्या वडिलांनी म्हटले होते की, माझ्या पत्नीसोबत एमएस शाह याचे संबंध आहेत. याच काळात शाह याची नजर १५ वर्षांच्या मुलीवर पडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण, पीडित मुलीनेच वडिलांनी केलेले आरोप फेटाळले होते.
त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांविरोधात तिच्याच आईने तक्रार दिली होती. माझ्या पतीनेच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या आईने तक्रारीत केला होता. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या वडिलांनाच अटक केली होती. त्यानंतर एमएस शाह याच्या विरोधातील प्रकरण बंद करण्यात आले होते.
मोबाईलमुळे अडकला भाजप नेता
दरम्यान, हे प्रकरण बंद करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपी एमएस शाह याचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा रिपोर्ट आता आला आणि प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. मोबाईलमध्ये एमएस शाह आणि पीडित मुलगी यांच्यातील संभाषणाचे मेसेज आढळून आले. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी केलेले आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी शाह याच्याविरोधात डिजिटल माध्यमातून मुलीचा पाठलाग करणे, लैंगिक शोषण करणे आणि विनयभंग केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी एमएस शाह याला अटक केली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईलाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू केला आहे.