Bihar Crime:बिहारच्या पूर्णियामधून बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका भावाने आपल्याच बहिणीची अतिशय निर्घृणपने हत्या केली. बहिणीला मारण्यापूर्वी आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आधी त्याने बहिणीच्या पायाचे बोट हातोड्याने चिरडले आणि नंतर तिला गोळ्या घातल्या. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर भाऊ फरार झाला
ही घटना मधुबनी बाजारपेठेजवळ घडली. मृत तरुणीचे नाव छोटी कुमारी असे आहे. गोळी मारण्यापूर्वी तरुणीचा अतिशय अमानुष छळ करण्यात आला. यावरुनच घटनेची भीषणता लक्षात येते. आरोपी भावाने आधी तिच्या पायाचे बोट हातोड्याने चिरडले, नंतर तिला गोळी मारली. आरोपी भावाला त्याच्या बहिणीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. ही संपूर्ण घटना नियोजनबद्ध पद्धतीने घडली. बंदूक आधीच घरात लपवून ठेवली होती. घटनेनंतर आरोपी भाऊ फरार झाला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला
मृताच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी घराच्या दाराशी पडलेली दिसली, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराची घटना किंवा बंदुकीचा आवाज प्रत्यक्ष कोणीही ऐकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबातील सदस्यांवरही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण आणि छळाची माहिती स्पष्ट होईल.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, भाऊ आपल्याच बहिणीसोबत इतका क्रूरपणे वागेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. प्रेमप्रकरणातून घडलेली ही घटना केवळ कुटुंबासाठीच नाही, तर समाजासाठीही लज्जास्पद आहे. आरोपीच्या शोधात पोलीस छापे टाकत असून, लवकरच त्याला अटक केले जाईल.