Bihar Crime : सोन्याची दुकाने लुटल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, बिहारच्या अराहमध्ये दिवसाढवळ्या 25 कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील गोपाळी चौकातील तनिष्क ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लुटून पोबारा केला. या दरोड्याची संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शोरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोड्याची ही घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोर शोरुममध्ये घुसतात आणि दुकानातील सर्वांना धमकावून सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने बॅगेत भरुन पळ काढतात. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्टोअर मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, सुमारे 25 कोटी रुपयांचे दागिने लुटले गेले आहेत. तर, रोख रकमेचे मूल्यांकन केले जात आहे.
दरम्यान, दरोड्यानंतर भोजपूरच्या एसपीसह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. एसपी राज म्हणाले की, गुन्हेगारांची ओळख पटवली जात असून त्यांच्या अटकेसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मात्र शोरुमपासून अवघ्या 600 मीटर अंतरावर असलेल्या नगर पोलिस ठाण्याचे पोलिस दरोड्याच्या वेळी घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.