सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन
By सोमनाथ खताळ | Updated: September 28, 2023 15:25 IST2023-09-28T15:25:22+5:302023-09-28T15:25:38+5:30
ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात.

सायबर भामट्यांपासून सावध राहा, सायबर पोलिसांचे आवाहन
बीड : सुटीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना जास्त घडतात. कारण सायबर पोलिसांकडे तक्रार केली तरी पुढील कारवाई करण्यासाठी बँकांची मदत हवी असते. अशावेळी बँक बंद असल्याने सायबर भामटे आपला डाव साधतात, असा अनुभव सायबर पोलिसांचा आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती व मोबाइलवर आलेला ओटीपी देऊ नये, अनोळखी लिंक उघडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर व्यक्ती तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठतात. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन सायबर पोलिसांकडून संबंधित बँक आणि कंपनीला ई-मेल पाठविले जातातर; परंतु सुटी असल्याने त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळत नाही. एवढ्यात सायबर भामटे हे पळविलेली रक्कम काढून घेतात. त्यामुळे ती परत मिळविताना अथवा थांबविताना पोलिसांना कसरत करावी लागते.
अनेकदा ही रक्कम मिळतही नाही. त्यामुळे सुट्यांमध्ये नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली फसवणूक होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सपोनि भारत काळे, उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, निशिगंधा खुळे व सायबर टीमने केले आहे.