जळगावात आयपीएलवर सट्टा; तिघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 23:01 IST2022-04-17T23:01:02+5:302022-04-17T23:01:18+5:30
रोकडसह साहित्य जप्त : पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्यावर सट्टा

जळगावात आयपीएलवर सट्टा; तिघांना घेतले ताब्यात
जळगाव: आयपीएलच्या पंजाब विरुद्ध हैदराबाद या सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या तिघांना पोलिसांनी रविवारी रात्री फातेमा नगरातून ताब्यात घेतले आहे.
इम्रान अमीन खान (वय ४०, रा.चिखली, जि.बुलडाणा, ह.मु.फातेमा नगर), वसीम सैय्यद कामरोद्दीन (वय३८) व जावेद नबी शेख (वय ३० रा.फातेमा नगर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले.
जळगावातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी रात्री साडे सात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किशोर पवार, चिंथा यांच्या कार्यालयातील मीनल साकळीकर, रवींद्र मोतीराया महेश महाले यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी फातेमा नगरातील आयेशा किराणाजवळ छापा टाकला असता मोठ्या टीव्ही वर तसेच लॅपटॉपवर पंजाब विरुद्ध हैदराबाद या सामन्यावर तिघं जण सट्टा खेळताना आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत साहित्य व रोकड हस्तगत केली.
याप्रकरणी रवींद्र मोतीराया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.