बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे उघड होत आहेत. या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचं समोर आले. त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलीस जबाब समोर आला आहे. त्यात हत्येच्या आदल्या दिवशी पती संतोष देशमुख यांनी पत्नीशी काय संवाद साधला हे पत्नीने पोलिसांना सांगितले.
पोलीस जबाबात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड आणि त्याचे लोक गुंड प्रवृत्तीचे असून ते आपल्याला मारून टाकतील असं संतोष यांनी सांगितले होते. विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी यांच्यात चर्चा झाली. वाल्मीक अण्णा, जिवंत सोडणार नाही असं चाटे म्हणाल्याचं संतोष देशमुखांनी पत्नीला सांगितले होते. ६ तारखेला अवादा कंपनीला खंडणी मागण्यासाठी कराड यांचे लोक सुदर्शन घुले गावात आले असताना त्यांच्याशी संतोष देशमुख यांचा वाद झाला. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला.
जी भांडणे झाली, ज्यांच्यासोबत भांडण झाले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. वाल्मीक कराड हा विष्णू चाटेच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकी देत होता. संतोष देशमुख यांनाही धमकी दिली होती. त्यातून संतोष देशमुख तणावात होते. त्यानंतर पुढच्या ३ दिवसात ९ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण झाले. अपहरणानंतर त्यांच्यासोबत क्रूरपणे अमानुष छळ करून हत्या करण्यात आली. मात्र ६ ते ९ या ३ दिवसांच्या काळात संतोष देशमुख आणि पत्नीचे या विषयावर बोलणे झाले होते. विष्णू चाटेचा फोन पत्नीसमोर संतोष देशमुख यांना आला होता असं जबाबात पुढे आले आहे.
आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही जबाब, ६ वेळा मागितली खंडणी
आवादा एनर्जी प्रा.लि या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सुनील शिंदे काम पाहतात. त्यांचाही सीआयडीकडून जबाब घेतला आहे. त्यात वाल्मीक कराडने एक दोन नव्हे तर तब्बल ६ वेळा खंडणी मागितली. फोनवरून न ऐकल्याने ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह गुंडांना तिथे पाठवले. परंतु संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या झाली असं त्यांनी जबाबात सांगितले आहे.