बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 6, 2022 22:26 IST2022-10-06T22:26:44+5:302022-10-06T22:26:50+5:30
लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना
नवी मुंबई : मानलेल्या बहिणीला मोटरसायकलवर लिफ्ट देऊन अर्ध्यात सोडल्याच्या वादातून दोघांना जबर मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यात एकाच्या डोक्याला टाके पडले आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली गाव येथे राहणाऱ्या प्रेम गायकर व वेद पाटील यांना हि मारहाण झाली आहे. प्रेम याची मानलेली बहीण जुईनगर येथे कामाला असून त्याचा मित्र तन्मय देखील त्याच ठिकाणी नोकरी करतो. तो नेहमी तिला कामावर ये जा करण्यासाठी मोटारसायकलवरून लिफ्ट देत असतो. काही दिवसांपूर्वी तन्मय याने प्रेमाच्या मानलेल्या बहिणीला अर्ध्या रस्त्यात सोडून तो निघून गेल्याचा प्रकार घडला होता. यावेळी प्रेम व त्याचा मित्र वेद पाटील यांनी जाऊन तिला मोटारसायकलवरून घरी आणले होते.
यादरम्यान प्रेमने तन्मयल फोन करून बहिणीला अर्धवट सोडण्याचे व कामावरून येण्यास उशीर होण्याचे कारण विचारले. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच कारणातून घणसोली गावालगत तन्मयने विकास साहू व इतर दोन मित्रांच्या मदतीने प्रेम व वेदला एकांतात गाठून जबर मारहाण केली. ते दोघेही ऐरोलीवरून गरबा खेळून घरी जात असताना मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून चौघांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.