'तुम्हाला येथून पळवून लावू' असे म्हणत बहिण-भावाला मारहाण!
By शेखर पानसरे | Updated: September 12, 2023 14:48 IST2023-09-12T14:47:57+5:302023-09-12T14:48:06+5:30
या प्रकरणी १८ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

'तुम्हाला येथून पळवून लावू' असे म्हणत बहिण-भावाला मारहाण!
संगमनेर : ‘तुम्ही येथील रहिवासी नाहीत, तुम्हाला येथून पळवून लावू’ असे म्हणत बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात रविवारी (दि.१०) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी १८ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
सलमान युनूस शेख, जुनेद युनूस शेख (दोघेही रा. नॅशनल स्कुलजवळ, कोल्हेवाडी रस्ता, संगमनेर), फरदिन अन्सार शेख (रा. मदिनानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. १८ वर्षीय युवक आणि त्याची बहीण हे दोघेच घरात असताना सलमान शेख, जुनेद शेख आणि फरदिन शेख हे तिघे त्यांच्या घरी गेले. सलमान आणि जुनेद या दोघांनी मुलीची छेड काढत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
तिचा भाऊ त्यांना समजावून सांगत असताना तिघांनीही बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. ‘तुम्ही येथील रहिवासी नाहीत, तुम्हाला येथून पळवून लावू’ अशी दमबाजी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस नाईक गवळी अधिक तपास करीत आहेत.