पुणे : शिक्रापूर येथे झालेल्या मुलीवरील लैगिक अत्याचाराच्या घटनेत तक्रार करण्यास मदत केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराच्या गुंडांनी तरुणाला मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना खराडी येथील एशियन पेंट शॉपच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी सचिन गणेश सातव (वय ३८, रा. वाघोली) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या घटनेत सातव यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव यांच्या मित्राच्या मुलीवर दीपक ठोंबरे (रा़ वाघोली) याने लैंगिक अत्याचार केला. त्यावरुन शिक्रापूर पोलिसांनी ठोंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने पाषाण येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी सचिन सातव यांनी मित्राला मदत केली होती . या प्रकारानंतर २५ सप्टेंबरला सचिन सातव हे घरी जात असताना चार अनोळखी लोकांनी त्यांना अडवत शिवीगाळ केली. मुलीच्या प्रकरणात लय लक्ष घालतो काय ठोका असे बोलून लोखंडी रॉडने सातव यांच्या हातावर, पायावर, बरगड्यांवर व पायाच्या नडगीवर दगडाने मारहाण केली़ त्यात सातव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार घेतल्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दीपक ठोंबरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
लैंगिक अत्याचार प्रकरणी तक्रार करण्यास मदत केल्याने गुन्हेगाराच्या गुंडांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 15:01 IST
खराडी येथील घटना, हाताचे हाड केले फ्रॅक्चर
लैंगिक अत्याचार प्रकरणी तक्रार करण्यास मदत केल्याने गुन्हेगाराच्या गुंडांनी केली मारहाण
ठळक मुद्देयाप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे दिली फिर्याद