उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बाळाच्या उपचाराच्या नावाखाली तब्बल २२ दिवस पैसे उकळण्यात आले. असा आरोप आहे की, रुग्णालयाने मृत मुलाला आयसीयूमध्ये ठेवलं आणि कुटुंबाकडून मोठी रक्कम वसूल करत लाखोंचं बिल दिलं. आयुष्मान कार्डने उपचार सुरू झाले आणि नंतर मुलाच्या कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेण्यात आले.
मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा गंभीर आजारी आहे आणि चांगल्या उपचारांच्या आशेने त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मुलावर २२ दिवस उपचार सुरू राहिले, परंतु या काळात डॉक्टरांच्या हेतूवर आणि उपचारांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. कुटुंबाचा आरोप आहे की मुलाची प्रकृती सतत खालावत होती.
मुलाला वाचवण्यासाठी शेत ठेवलं गहाण
अनेक वेळा त्यांनी डॉक्टरांना मुलाला मोठ्या आणि सुसज्ज रुग्णालयात पाठवण्याची विनंती केली, परंतु प्रत्येक वेळी डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित त्यांचा हेतू मुलाला निरोगी करण्यापेक्षा कुटुंबाकडून शक्य तितके पैसे उकळण्याचा होता. कुटुंबाने त्यांची संपूर्ण बचत मुलाच्या उपचारासाठी खर्च केली. कुटुंबाकडचे पैसे संपले तेव्हा त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी त्यांचं शेतही गहाण ठेवलं.
पत्नीचे सर्व दागिने विकले
रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी आणि मुलाला वाचवण्यासाठी मुलाच्या वडिलांना त्यांच्या पत्नीचे सर्व दागिने विकावे लागले. पालकांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी जे काही मागितलं ते दिलं, परंतु असे असूनही, रुग्णालयाने मुलाच्या कुटुंबाकडून पैसे उकळले. या प्रकरणाबाबत सीएमओ राजीव निगम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी एक टीम तयार केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.