बँकेच्या उपाध्यक्षाचीच ६६ लाखांची फसवणूक; शेअरमध्ये २०० टक्के नफ्याचे प्रलोभन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:49 IST2025-10-03T10:48:55+5:302025-10-03T10:49:44+5:30
सायबर लुटारूंनी बँकेच्या उपाध्यक्षाची ६६ लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

बँकेच्या उपाध्यक्षाचीच ६६ लाखांची फसवणूक; शेअरमध्ये २०० टक्के नफ्याचे प्रलोभन
मीरा रोड : सायबर लुटारूंनी बँकेच्या उपाध्यक्षाची ६६ लाख ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना २०० टक्के फायदा होण्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केली आहे.
मीरा रोडच्या विनयनगर जेपी नॉर्थ गार्डनमध्ये राहणारे समीर इसाक खलिफे (५१) हे एका बँकेच्या मुंबई कॉर्पोरेट कार्यालयात उपाध्यक्ष पदावर नोकरी करीत आहेत. मार्चमध्ये त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर संदेश आला, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रतिमहिना २०० टक्के फायदा होईल. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यास सांगण्यात आले. खलिफे यांनी व्हाॅट्सॲप ग्रुप जॉइन करून १० दिवस निरीक्षण केले असता ग्रुपमधील सदस्य त्यांना झालेला नफा त्यात दाखविण्यात आला हाेता.
दोन कोटी ७७ लाख नफा दिसला; पण...
आरोपींवर विश्वास बसल्याने थोडेथोडे करून समीर खलिफे यांनी ६६ लाख ७१ हजार २१७ रुपये त्यांनी विविध खात्यातून गुंतवले. काही दिवसांनी नफा म्हणून दोन कोटी ७७ लाख ५६ हजार रुपये दिसून येत होते. मात्र, रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती निघत नव्हती. त्यांनी संबंधितांशी संपर्क केला असता त्यांना आणखीन रक्कम गुंतवण्यास सांगितले.
अनेकांवर गुन्हा दाखल
आणखी पैसे नसल्याने, तसेच समोरच्या आरोपींनी पूर्ण प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर समीर यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १ ऑक्टोबरला पोलिसांनी संजना, अजय केडिया, आकाश बंसल, अशी नावे सांगणाऱ्या मोबाइल क्रमांकधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रुप ॲडमिन संजना, अजय केडिया यांच्याशी चॅटिंग व बोलणे केले असता जॉइन होण्यासाठी गुगल फॉर्म पाठवला. तो फॉर्म भरल्यावर त्यांनी सांगितल्यानुसार वेबसाइट लॉगिन केले.