कडवविरुद्ध बँक व्यवस्थापकाची तक्रार : २ लाखांचे ११ लाख घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 23:47 IST2020-07-17T23:44:21+5:302020-07-17T23:47:01+5:30
व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती.

कडवविरुद्ध बँक व्यवस्थापकाची तक्रार : २ लाखांचे ११ लाख घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका बँक व्यवस्थापकाच्या मित्राने २०१४-१५ ला मंगेश कडव याच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले. त्यापोटी तीन-चार वर्षात कडवला संबंधित व्यक्तीने एकदा पाच आणि दुसऱ्यांदा सहा असे एकूण ११ लाख रुपये दिले. २ लाखाचे ११ लाख रुपये घेऊनही कडवने आणखी रक्कम हवी म्हणून बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हिसकावून नेली. या प्रकरणाची कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती. मात्र तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी मंगेश कडवच्या या पापाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आता गुन्हे शाखेने त्याची कुंडली बाहेर काढल्यामुळे बँक व्यवस्थापकाने हिंमत करून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. या पार्श्वभूमीवर, तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पोलीस कोठडी वाढली
मंगेश कडवला आज न्यायालयात हजर करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा आणखी दोन दिवसाचा पीसीआर मिळवला. तब्बल सात गुन्हे आतापर्यंत कडवविरुद्ध दाखल झाले आहेत. त्यामुळे एक महिना विविध प्रकरणाच्या संबंधाने मंगेश कडव पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे.